
दुसऱ्या मजल्यावरून खाली येताना पाच वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत एक तास अथक प्रयत्न करून कटरच्या सहाय्याने लिफ्ट कापून मुलाला बाहेर काढले. मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील विजलपूर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. सदर मुलगा आईसोबत बाहेर चालला होता. आई दरवाजाला टाळं लावत असतानाच मुलगा धावत लिफ्टमध्ये घुसला. आईही मागोमाग धावली मात्र तोपर्यंत लिफ्ट बंद झाली होती. मुलाच्या शरीराचा एक भाग लिफ्टमध्ये अडकला.
तात्काळ अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत कटर मशिनने लिफ्ट कापून मुलाला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.