कांदा-लसूणच्या वापरावरून संसार तुटला; गुजरातच्या दाम्पत्याचा 12 वर्षे घटस्फोटासाठी लढा

जेवणात कांदा-लसूण वापरावरून अहमदाबादमधील एका जोडप्याने आपला संसार मोडल्याचे समोर आलं आहे. घटस्फोट मिळवण्यासाठी जोडप्याने 12 वर्षे कौटुंबिक न्यायालय आणि उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढली. पती-पत्नीमध्ये तडजोड करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र दोघेही आपल्या मतावर ठाम राहिले. अखेर 12 वर्षांनी गुजरात उच्च न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या या जोडप्याचे 2002 मध्ये लग्न झाले होते. सुरुवातीला त्यांचे नाते सुरळीत चालू होते. परंतु पत्नीच्या धार्मिक श्रद्धेमुळे त्यांच्या नात्यात हळूहळू वाद होऊ लागला. पत्नी स्वामीनारायण पंथाची अनुयायी होती. या पंथाच्या तत्त्वांनुसार पत्नी कांदा-लसूण खात नव्हती. पती आणि त्याचे कुटुंब कांदा-लसूण खात होते. यावरून घरामध्ये वाद होऊ लागले.

पती आणि सासरच्यांनी घरात कांदा-लसूण आणू नये अशी पत्नीची मागणी होती. पतीला पत्नीची ही मागणी मंजूर नव्हती. यामुळे एकाच घरात स्वतंत्र स्वयंपाकघरे तयार झाली. दोघांमधील अंतर वाढत गेले आणि घरगुती वातावरण बिघडू लागले. शेवटी पत्नी मुलासह तिच्या माहेरी निघून गेली. त्यानंतर, 2013 मध्ये, पतीने अहमदाबाद कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पतीने पत्नीवर क्रूर वागणे आणि विना कारण घर सोडल्याचा आरोप केला. जवळपास 11 वर्षांच्या खटल्यानंतर, कुटुंब न्यायालयाने 8 मे 2024 रोजी पतीची घटस्फोटाची याचिका मंजूर केली. न्यायालयाने पतीला त्याच्या पत्नी आणि मुलासाठी पोटगी देण्याचे आदेशही दिले. मात्र, प्रकरण तिथेच संपले नाही.

पोटगीच्या आदेशाविरोधात पतीने थेट गुजरात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दरम्यान, कुटुंब न्यायालयाच्या घटस्फोटाच्या निर्णयाला आव्हान देत पत्नीनेही उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, पत्नीने घटस्फोटावर कोणताही आक्षेप नसून लग्न मोडण्यास तयार असल्याचे सांगितले. दोन्ही पक्ष घटस्फोटावर सहमत असल्याने या मुद्द्यावर अधिक विचार करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत न्यायमूर्ती संगीता विशेन आणि न्यायमूर्ती निशा ठाकोर यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.