
अपघाताच्या आघातानंतर मरणासन्न जगणे जगणाऱ्या हरीश राणाने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या जगण्याच्या असह्य वेदना लक्षात घेत इच्छामरणाला परवानगी दिली होती. त्यानुसार कुटुंबियांनी हरीशला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले होते. तेथे हरीशवरील उपचार हळूहळू बंद करुन त्याचा जीवनप्रवास थांबवण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरु केली होती. मागील दहा दिवस त्याच्यावर ही प्रक्रिया सुरु होती. अखेर मंगळवारी हरीशचा वेदनादायी जीवनप्रवास थांबला.
वैद्यकीय अहवाल आणि कुटुंबाची संमती विचारात घेऊन हरीशची मरणासन्न जगण्यातून सुटका करण्यासाठी इच्छामरणाला परवानगी देण्याचा ऐतिहासिक निकाल दिला. हरीशला दिल्लीतील एम्स रुग्णालयात पॅलिएटिव्ह केअर विभागात दाखल करावे आणि त्याच्या अंत्यकाळच्या देखभालीसाठी एक सर्वसमावेशक योजना तयार करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
मूळचा गाझियाबादचा असलेला हरीश राणा 2013 मध्ये पंजाब विद्यापीठात शिकत होता. यादरम्यान वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर डॉक्टरांनी त्याला लाईफ सपोर्टवर ठेवले होते. तेव्हापासून गेली 13 वर्षे तो अंथरुणाला खिळलेला होता.

























































