
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. एका रिक्षाचालकाला तब्बल 38.5 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याबद्दल आयकर विभागाची नोटिस आली. नोटिस पाहून रिक्षाचालकाला आणि त्याच्या पत्नीला धक्का बसला. याबाबत चौकशी केली असता रिक्षाचालकाचे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि फोटोचा गैरवापर करण्यात आल्याचे उघड झाले.
गंझाखेडा माजरा कुकुरा गावातील रहिवासी असलेला रामपाल दिल्लीत रिक्षा चालवतो. त्याची पत्नी घरकाम करते. तीन वर्षांपूर्वी रामपालच्या आईचे निधन झाले. त्यावेळी दिल्लीत वाहन बुकिंग करताना चोरट्याने त्याचा मोबाईल हिसकावून नेला. या मोबाईलमध्ये त्याच्या आधार कार्ड, पॅनकार्डचे फोटो होते.
काही दिवसांपूर्वी पोस्टमनने गावातील शिंपी रजनीशला एक पत्र दिले. शिंप्याने हे पत्र राजपालला पाठवले. रामपालने पत्र उघडून पाहताच त्याच्या पायाखालची जमिन सरकली. आयकर विभागाकडून त्याला 38.5 कोटींच्या व्यवहारासाठी आणि आयकर विवरणपत्र न भरल्याबद्दलची नोटीस होती.
यानंतर रामपालने ते पत्र उच्च न्यायालयाच्या वकिलाला दाखवले. वकिलांनी त्याच्या पॅन कार्डचा तपशील काढला असता 2023-24 आर्थिक वर्षात 7.5 कोटी रुपये आणि 2024-25 आर्थिक वर्षात 31 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले. त्याच्या पॅन कार्डचा वापर करून 38.5 कोटींचे व्यवहार झाले. आता आयकर विभागाने त्याचे आयकर विवरणपत्र न भरल्याबद्दल नोटीस बजावली आहे. रामपाल पत्नी रामलालीसोबत गेल्या 15 वर्षांपासून दिल्लीत वास्तव्यास आहे. तो ई-रिक्षा चालवतो, तर त्याची पत्नी घरकाम करते. गावात त्याची एक एकर जमीन आहे, ज्यावर तो शेती करतो.


























































