
पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. आरजी मेडिकल कॉलेजमधील घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच आणखी एका विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. कॉलेजच्या कॅम्पसबाहेर मित्रासोबत जेवायला गेलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला अज्ञातांनी बळजबरीने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असून दुर्गापूरच्या शोभापूर परिसरातील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पीडिता तिच्या वर्गमित्रासोबत कॅम्पसबाहेर जेवायला गेली होती. परत येत असताना दोन-तीन तरुणांनी त्यांना अडवले. एकाने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि दुसऱ्याने तिला एका निर्जन भागात ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
घटनेनंतर पीडितेच्या मित्राने तिला त्याच वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलिसांकडून सामूहिक बलात्काराच्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिच्या मित्राची भूमिका देखील तपासली जात आहे. घटना उघडकीस आल्यानंतर आरोग्य शिक्षण संचालक इंद्रजित साहा यांनी सदर वैद्यकीय महाविद्यालयाला तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ दुर्गापूर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मूक निषेध केला.