
हैदराबादमध्ये मातृत्वाला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. बाळाच्या सतत रडण्याने संतापलेल्या मातेने दोन महिन्यांच्या मुलाला चुलीत टाकले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी निर्दयी मातेविरोधात गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ रडू नये म्हणून महिलेने त्याच्या तोंडात कापड कोंबले होते आणि डोळ्यांना पट्टी बांधली होती. मुलाचे वडील नाईट ड्युटीवरून सकाळी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. चुलीत होरपळून बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राजेंद्र आणि ममता हे जोडपे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असून सध्या हैदराबादमध्ये वास्तव्यास आहे. राजेंद्र एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मुलाच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्रसुतीनंतर ममत नैराश्येत गेली होती. बाळ सतत रडत असल्याने तिला राग अनावर झाला आणि त्यातूनच तिने हे कृत्य केले.



























































