
पहलगामचा दहशतवादी हल्ला म्हणजे धर्माच्या आधारावर केलेल्या टार्गेटेड हत्या असून त्याचा कट पाकिस्तानात रचण्यात आला होता. ‘लश्कर-ए-तोयबा’ने हा कट रचला होता आणि या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर साजिद जट्ट हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे. पहलगाम हल्ल्याप्रकरणी ‘एनआयए’ने जम्मू येथील विशेष एनआयए न्यायालयात 1,300 पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात या हल्ल्याशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा ‘एनआयए’ने केला आहे.
या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगामपासून 6 किलोमीटर अंतरावरील बायसरन येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात 26 पर्यटकांची धर्म विचारून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. हल्ल्याचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आला होता. ‘एनआयए’ने हल्ल्याच्या 237 दिवसांनी आरोपपत्र दाखल केले. त्यात ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘द रेझिस्टंस फोर्स’सह 7 दहशतवाद्यांना प्रमुख आरोपी बनविण्यात आले आहे. आरोपपत्रासोबतच एनआयएने महत्त्वाचे पुरावेदेखील जमा केले असून, हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचल्याचे एनआयएने म्हटले आहे.
आरोपपत्रात पाकिस्तानात असलेला कुख्यात दहशतवादी साजिद जट्ट याचा मास्टरमाइंड म्हणून एनआयएने उल्लेख केला आहे. याशिवाय 28 जुलै रोजी ‘ऑपरेशन महादेव’मध्ये खात्मा करण्यात आलेल्या फैसल जट्ट ऊर्फ सुलेमान शाह, हबीब ताहिर ऊर्फ जिब्रान आणि हमजा अफगाणी यांनाही आरोपी बनविण्यात आले आहे. आरोपपत्रातील अधिक तपशील मिळाला नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणी लवकर खटला चालवून पीडितांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक मदतनीसांचाही आरोपपत्रात समावेश
एनआयएने पहलगाम हल्ल्याप्रकरणी एक हजारांपेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणारे, लॉजिस्टक मदत तसेच खाणेपिणे पुरविणाऱ्या बशीर अहमद जोथर, परवेझ जोथर आणि मोहम्मद युसूफ कटारी यांचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यांनी हल्ल्याच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे.
साजिद जट्टवर 10 लाखांचे बक्षीस
टीआरएफ ही लश्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी संघटना असून साजिद हा या संघटनेचा म्होरक्या आहे. जम्मू आणि कश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमागे याच संघटनेचा हात होता. टीआरएफवर 2023मध्ये बंदी घालण्यात आली होती. साजिदवर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.


























































