‘गो बॅक ज्ञानेश कुमार’, बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जोरदार नारेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कोलकाता येथे पोहोचलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधाचा सामना करावा लागला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात एकेकाळी ‘गो बॅक सायमन’च्या नाऱ्यांनी देश दुमदुमला होता. आता ‘गो बॅक ज्ञानेश कुमार’ अशी नारेबाजी कोलकात्यामध्ये करण्यात आली. तसे पोस्टर देखील झळकावण्यात आले. ज्ञानेश कुमार यांनी बंगालच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला असून संतापलेल्या ममतांनी त्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगालमधील राजकारण तापले आहे.

निवडणूक आयोगाच्या सर्व अधिकाऱ्यांची तीन दिवसीय बैठक कोलकाता येथे होत आहे. त्यासाठी ज्ञानेश कुमार हे रविवारी सायंकाळी कोलकाता येथे दाखल झाले. आज सकाळी ते कालीघाट येथे पूजा करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. अनेकांच्या हातात ‘गो बॅक ज्ञानेश कुमार’ लिहिलेले पोस्टर्स होते. याशिवाय आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे देखील दाखवले. पश्चिम बंगाल मध्ये एसआयआरवरुन तीव्र नाराजी आहे. लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्याविरोधात अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. एसआयआरमध्ये प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

कशावरून भडकल्या ममता बॅनर्जी?

ममता बॅनर्जी या चार दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांनी अधिकाऱ्यांना धमकावल्यावरुन ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. संवैधानिक पदावरील अधिकाऱ्यांची खोटी बहादुरी सहन केली जाणार नाही, असा इशारा ममतांनी दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नार्कोटिक्स सल्लागार समिती नसल्यावरून निवडणूक आयुक्तांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये कुठलीही चूक खपवून घेतली जाणार नाही, असे आयुक्तांनी बजावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.