
ग्वाल्हेरच्या विद्यार्थ्याचा स्कॉटलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. संस्कार श्रीवास्तव असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो स्कॉटलंडच्या सेव्हरन्स विद्यापीठात फॉरेन्सिक सायन्समध्ये एमएससीचे शिक्षण घेत होता. 18 दिवस उलटले तरी संस्कारचे आई-वडील आपल्या मुलाच्या मृतदेहाच्या प्रतिक्षेत आहेत.
ग्वाल्हेरच्या बहोदापूर परिसरात राहणाऱ्या कुलदीप यांनी आपला मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी बँकेकडून 39 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. संस्कार 5 मार्च रोजी व्हिडिओ कॉलद्वारे एक तासभर आपल्या कुटुंबाशी बोलला. यानंतर 7 मार्च रोजी संस्कारच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला मिळाली.
मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबाला धक्काच बसला. संस्कार ज्या विद्यापीठात शिकत होता, तिथे काहीतरी गडबड आहे. यापूर्वीही तीन विद्यार्थ्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. हा अशा प्रकारचा चौथा संशयास्पद मृत्यू आहे. याबाबत हिंदुस्थान सरकारने पुढाकार घेऊन निष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशी मागणी संस्कारच्या वडिलांनी केली आहे.




























































