
अजमेर-दादर एक्सप्रेसला बॉम्बने उडवण्याची योजना आखत असल्याचे समोर येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे ही बाब उघडकीस आली आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही संशयितांना अटक केली. संभाव्य धोका लक्षात घेताच पोलिसांनी स्टेशन परिसर आणि सर्व गाड्यांची तात्काळ तपासणी केली. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
तीन तरुण बुधवारी दुपारी ऑटो रिक्षात बसून ट्रेन उडवण्याच्या योजनांवर चर्चा करत होते. रिक्षाचालकाने प्रसंगावधान दाखवत तरुणांच्या या संभाषणाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच, अजमेर पोलीस, जीआरपी, आरपीएफ आणि क्लॉक टॉवर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.
पोलिसांनी तिन्ही तरुणांना ताब्यात घेत जीआरपी कार्यालयात नेले. तिघांचेही कॉल डिटेल्स तपासण्यात येत आहेत. पोलिसांनी संशयितांचे मोबाईल फोन जप्त केले असून त्यांचे कॉल डिटेल्स तपासत आहेत. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवर सुरक्षा तपासणी तीव्र करण्यात आली. श्वान पथके, मेटल डिटेक्टर आणि बॉम्ब निकामी पथके देखील बोलावण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून तपासणी सुरू केली आणि स्थानकावर उभ्या असलेल्या गाड्यांचीही तपासणी केली. हे तिघे तरुण खोडसाळपणा करत होते की खरोखरच गंभीर कट रचत होते याचाही तपास पोलीस करत आहेत.


























































