
बस चालवत असतानाच चालकाला फिट आली. यामुळे चुकून त्याचा पाय एस्कीलेटरवर पडला आणि बस अनियंत्रित होऊन नऊ वाहनांना धडकली. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी करत आहेत.
बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ रविवारी हा अपघात झाला. बस चालकाला फिट आल्याने बीएमटीसी (बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) ची बस नियंत्रणाबाहेर गेली आणि एकामागून एक नऊ वाहनांना धडकली. यादरम्यान, कंडक्टरने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. बसने ऑटोरिक्षा, कार आणि दुचाकीसह नऊ वाहनांना धडक दिली.
सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, क्यूबन पार्क वाहतूक पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे आणि तपास सुरू केला आहे. अपघाताच्या कारणाचा सविस्तर तपास सुरू आहे.