नॅशनल पार्कमध्ये डोंगर पोखरून केला रस्ता, सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल पार्कमधील इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये सनियंत्रण समितीची परवानगी न घेता रस्ता तसेच नैसर्गिक तलाव सुशोभीकरण व दगडी गटाराचे बांधकाम केल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. या प्रकरणी सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन या कंपनीविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

मौजे वसावे शासकीय विश्रामगृहामागे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये डोंगर पोखरून रस्ता तयार करण्यात आला आहे. नैसगिक तलावामध्ये भराव टाकण्यात आल्यासंदर्भातील तारांकित प्रश्न आमदार अमित झनक, अमीन पटेल आदीनी उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात वनमंत्री संजय राठोड यांनी वरील उत्तर दिले. त्याचवेळी दहिसर चेकनाक्यापासून मीरा, काशी, वरसावे, घोडबंदर, चेणे व काजूपाडय़ापर्यंतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रात बेकायदा खोदकाम, भराव, बांधकामे होत नसल्याचेही लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात करण्यात आलेली कारवाई ही ठाणे विभागाकडून केल्याचे नमूद केले.