
राज्यासह देशभरात पुन्हा कोरोना वाढू लागला असून कोरोना नियमांकडे नागरिकांचे दुर्लक्ष आणि केंद्र सरकारकडून वेळेवर न होणारा लसीचा पुरवठा यामुळे मे महिन्यापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहणार आहे, असा इशारा राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिला आहे.
देशात 2020 पासून कोरोनाचे रुग्ण सापडत असून मुंबईसह राज्यातही कोरोना रुग्ण सापडू लागले. मात्र, मुंबईसह राज्यात आलेल्या तीनही लाटा नियंत्रणात आणण्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारला यश आले. मात्र, मार्च 2023पासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले असून त्यात सहव्याधी रुग्णांची संख्या मोठी आहे.
सहव्याधी, ज्येष्ठांच्या जीवाला धोका जास्त
मुंबईसह राज्यात सहव्याधी असलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका जास्त आहे. लसीकरण आणि कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यातून निर्माण झालेली नैसर्गिक रोगप्रतिकारक आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दोन लसींसह बुस्टर डोस घेतलेल्या सहव्याधी आणि ज्येष्ठांच्या जीवाला धोका जास्त आहे, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
जनुकीय अहवाल, लसी तातडीने पुरवा
सध्या देशात मोठया प्रमाणात लसींचा तुटवडा आहे. जी आहे त्यात कोरोनाच्या सध्याचा उपप्रकाराला दाद देण्याची क्षमता आहे की, नाही याबाबत स्पष्टता नाही. आहे त्या उपलब्ध लसींना अधिक सक्षम केले पाहिजे आणि या बदल केलेल्या लसी तातडीने लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्याचबरोबर जे नमुने जनुकीय चाचण्यांसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांच्या चाचण्याही तातडीने करून त्यांचे अहवालही तातडीने राज्यांकडे पाठवले पाहिजे. त्यामुळे राज्यांना तातडीने उपचारांबद्दल निर्णय घेणे शक्य होणार आहे. मात्र, हे काम खूप धीम्या गतीने सुरू आहेत, अशी माहिती डॉ. साळुंखे यांनी दिली.




























































