पुन्हा देशव्यापी शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांचा केंद्राला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी कायद्यांवरून मोदी सरकारला नमवणारे शेतकरी पुन्हा मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी तसा इशाराच दिला. देशात पुन्हा शेतकरी आंदोलनाची गरज आहे. विरोधी पक्षांनी एकजूट दाखवून हा लढा उभारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र सरकारच्या धान खरेदी धोरणाच्या निषेधार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलकांना भेटून टिकैत यांनी केंद्राला इशारा दिला. शेतकऱयांच्या प्रश्नांसाठी लढणाऱया प्रत्येक मुख्यमंत्र्यांना संयुक्त किसान मोर्चाचा पाठिंबा असेल. शेतकऱयांच्या प्रश्नांवर पुन्हा आंदोलन करण्याची गरज आहे. तारीख, ठिकाण लवकरच जाहीर करू. शेतकऱयांनी आवाज उठवला की लगेच ईडी पाठवली जाते. पण शेतकरी दुबळा नाही, तो हक्कांसाठी लढणारच, असा इशारा टिकैत यांनी मोदी सरकारला दिला.