नटरंग…उत्कृष्ट खेळ मांडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला
साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला…

संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच देवरूख यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या ‘नटरंग’च्या प्रयोगाला अभिनय, नृत्य आणि संगीताने रंग चढलाच. १९८० मध्ये आनंद यादव यांनी लिहिलेल्या नटरंग यापुस्तकातील गुणा कागलकर हा पडद्यावर आणि रंगमंचावर खूप गाजला. लेखक विजय पडलकर यांनी हा ‘नटरंग’ गावरान भाषेत अधिक बेधकपणे मांडलाय. तमाशाचे वेड असलेला गुणा सुधीर सावंत यांनी अभिनयातून जबरदस्त साकारलाय. तमाशात राजा होण्याचं स्वप्न पहाणाऱ्या गुणा कुणी नाच्याच्या भूमिकेसाठी कलाकार मिळत नाही म्हणून तोच नाच्या बनतो. तमाशात नाच्याची भूमिका करतो म्हणून गावातले लोक त्याला हसतात पण तो त्याकडे दुर्लक्ष करत तमाशा सुरुच ठेवतो असा स्वाभिमानी लोककलावंत सुधीर सावंत यांनी रंगमंचावर उभा केलाय.

‘उसवलं गणगोत सारं आधार कुणाचा नाही’ अशी अवस्था झालेल्या गुणा शेवटच्या दोन प्रवेशात अंगावर काटा आणतो. तमाशा बेचिराख झाल्यानंतर पुन्हा सासुरवाडीत जाऊन बायका पोरांना घेऊन संसार उभं करण्याची स्वप्न पहाणाऱ्या गुणाला बायकापोरांकडून मिळालेले उत्तर लोककलावंताच्या जीवनाची दाहकता सांगते. आवश्यक तितकं नेपथ्य, ग्रामीण भाषेचा लहेजा, संगीत, वेशभूषा आणि रंगभूषेतून हे प्रायोगिक नाटक जीवंत झालं. दारकीची भूमिकेत रुपाली सावंत हिने प्रत्येक प्रसंगात आपल्या अभिनयाची छाप सोडली. गरीबी तिची दाहकता, नाच्याची बायको म्हणून समाजाची विखारी नजर आणि सासरीच पोराबाळांसोबत राहाण्याचा निर्णय घेणारी दारकी गुणा भोवती फिरणाऱ्या या कथानकात अभिनयाच्या ताकदीवर दखल घ्यायला लावते. कलाकरांचे आणि दिग्दर्शक संजय सावंत यांचे कौतुक करायला हवे कारण नाटक पहाताना प्रेक्षकांना नटरंग चित्रपट आठवला तरी कलाकारांवर या चित्रपटाचा काडीमात्र प्रभाव नव्हता. त्यांनी स्वःताची ओळख सांगणारा प्रयोग सादर केला. नटरंग नाटकातील अश्विनी कनावजे हिचा नृत्य अविष्कार अप्रतिम होता. पाडंबा हि व्यक्तीरेखेत लोककलावंताची झलक दिसली नाही. कुमार भजनावले यांनी पांडबाची भूमिका केली. याभूमिकेला आवश्यक तितका वाव नाटकात दिसला नाही. गुणाच्या वडीलांची भूमिका अभय पुरोहित आणि सासऱ्याची भूमिका संजय नटे यांनी खणखणीत साकारली.

पत्रकार आणि म्हातारी अशा दोन वेगळ्या भूमिकेत वैदही सावंत भाव खाऊन गेली. तमाशाच्या फडातील सहकलाकारांनी कुठेही अभिनयात तडजोड केली नाही. दोन प्रसंगात असलेला गुणाचा मुलाने अभिनयात चमक दाखवली. महेश चव्हाण, अगस्ति कुमटेकर, प्रशांत धामणस्कर, ओंकार चंदुलकर, प्रथमेश गुडेकर, जगदीश गौरूले, रोशन गोताड, रोहन सावंत, तेजश्री मुलये, अक्षता सावंत, कौस्तुभ चव्हाण, रोहित मोर्डेकर, सप्तर्षी कुमठेकर, सुरेश कदम, दिव्या शेट्ये, श्रध्दा पाध्ये, संजय भडेकर, क्षितिज जाधव, भाऊ पाटील, लुब्धा सावंत, प्रशांत बालगुडे अशा जम्बो टिमने आपल्या जबाबदाऱ्या चोख बजावल्या. विनायक सावर्डेकर यांच्या प्रकाश योजनेमुळे नाट्यप्रयोग अधिक प्रभावी झाला. रंगमंचावर दाखवलेली रात्र आणि तमाशावर झालेला हल्ला प्रकाशयोजनेतून अधिक प्रभावी ठरला. नाटकाचा शेवट शिवपार्वतीच्या नृत्यातून होतो त्या प्रसंगातही प्रकाशयोजनेला दाद द्यायला हवी. संजय सावंत आणि संजय नटे यांचे नेपथ्य आणि
मिलिंद लिंगायत आणि आनंद लिंगायत यांचे संगीत नाटकाला पुरक ठरले.