‘गोकुळ’च्या चेअरमनपदी हसन मुश्रीफांचे पुत्र नवीद यांची निवड

सहकार क्षेत्रात जिल्हय़ाचे आर्थिक व राजकीय सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चेअरमनपदाचा तिढा अखेर सुटला. राजकीय नाटय़मय घडामोडीनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरातच कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळसारख्या सत्तापेंद्राच्या चाव्या आल्याने त्यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा आहे.

गोकुळ दूध संघावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आहे. पंचवीस वर्षांची माजी आमदार महादेव महाडिक यांची सत्ता उलथवून या आघाडीची सत्ता आली आहे. पहिल्या दोन वर्षांसाठी आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय विश्वास पाटील यांच्याकडे दूध संघाच्या चेअरमन पदाची धुरा होती. यानंतर  अजित पवार गटाचे अरुण डोंगळे यांनी दोन वर्षं चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळला. पण राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गोकुळमधील सत्ताकारणाच्या हालचालीही वाढू लागल्या. चेअरमन पदाचा राजीनामा देण्यास अरुण डोंगळे यांनी नकार दिल्यानंतर गोकुळच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावल्याचे दिसून आले.

ऐनवेळी शशिकांत पाटील यांचे नाव मागे

गोकुळ दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. पण काल रात्री सुमारे अडीच तास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन एक नाव निश्चित करण्यात आले. निवड केलेले नाव अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले. त्यामुळे चेअरमन पदाची माळ गळय़ात पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी जल्लोषाची जोरदार तयारी केली होती. पण ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडले. आणि मंत्रिपुत्र नवीद यांच्या गळय़ात अध्यक्षपदाची माळ पडली.