तारीख पे तारीख… नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला सप्टेंबरचा मुहूर्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी आता न्यायालयातील खटल्याप्रमाणे ‘तारीख पे तारीख’ अदानी समूहाकडून जाहीर होऊ लागली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मार्चची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र त्यानंतर अचानक मेची डेडलाइन जाहीर करण्यात आली. अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी विमानतळाच्या साईटला भेट दिली आणि उद्घाटन जूनमध्ये होणार असल्याचे जाहीर केले. मात्र यापैकी एकही डेडलाइन पाळली गेली नाही. आता विमानतळाचे उद्घाटन येत्या सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचे अदानी समूहाने आमदारांच्या सार्वजनिक उपक्रम समितीसमोर स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नवी मुंबईतून विमानाचे टेकऑफ करण्याच्या जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदारांच्या सार्वजनिक उपक्रम समितीने नुकतीच विमानतळाच्या साईटला भेट दिली. या समितीने धावपट्टी, टॅक्सी रन वे, टर्मिनल आदी सुविधांची पाहणी केली. या समितीच्या शिष्टमंडळासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करताना नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त आता येत्या सप्टेंबरला ठरवला जाणार आहे असे अदानी समूहाने स्पष्ट केले. या विमानतळाचे उद्घाटन येत्या 15 ऑगस्ट रोजी करण्याची तयारी सिडको आणि राज्य सरकारने सुरू केली होती. मात्र त्यांच्या तयारीवर अदानी समूहाने आता पाणी फिरवले आहे. नवी मुंबई विमानतळ टर्मिनल-1 चे काम सध्या युद्धपातळीवर  सुरू आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत ते पूर्णत्वास जाणार असल्याचे बोलले जात आहे. 13 हजार कामगार विमानतळ प्रकल्पस्थळी काम करत आहेत.

टर्मिनलचे काम अवघड

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलला कमळाच्या पाकळ्यांचा आकार देण्यात आला आहे. टर्मिनलला कमळाच्या पाकळ्यांचा आकार देण्याचे काम अवघड आणि खडतर आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुरचनाकार व अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ रात्रंदिवस झटत आहेत. दरम्यान, हे विमानतळ सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिक्हिटी आणि व्यापारवाढीच्या नक्या संधी निर्माण होणार आहेत, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे.