एपीएमसी मार्केट बंद असले तरी मुंबईत भाजीपाला पोहोचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एपीएमसीतील मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर शनिवारपासून एपीएमसीमधील भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असला तरी मुंबई शहर आणि उपनगरांना भाजीपाल्याचा नियमित पुरवठा होणार आहे. मुंबईमध्ये थेट जाणाऱ्या मालावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर गुगुवारी तिन्ही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बैठका घेतल्या आणि मार्केट बंद करण्याची विनंती प्रशासनाला केली. त्यानुसार एपीएमसी प्रशासनाने शनिवारपासून तिन्ही मार्केट बंद करण्याची घोषणा केली. भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी 131 गाड्यांची आवक झाली. हा माल हातोहात विकला गेला. एका व्यापाऱ्य़ाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गुरुवारपासून एपीएमसीमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ मार्केट शनिवारपासून बंद राहणार असले तरी मसाला आणि धान्य मार्केट नियमित सुरू राहणार आहे.

दररोज 250 गाड्या थेट मुंबईत येणार
एपीएमसीमधील गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाल्याच्या फक्त 200 गाड्यांनाच दररोज मार्केटमध्ये प्रवेश दिला जात होता. हा नियम सुरू झाल्यापासून दररोज सुमारे 250 गाड्या एपीएमसीमध्ये न येता थेट मुंबईमध्ये जात आहे. तेव्हापासून एपीएमसीमधील शेतमालाची आवकही कमी झाली असून तिन्ही मार्केटमध्ये सुमारे 150 गाड्या माल येत होता. आता एपीएमसीमध्ये येणारा मालही थेट मुंबईमध्ये जाणार आहे. त्यामुळे मुंबई शहरात भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही, असे एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.