महापौरांनी आयुक्तांना बजावले, ‘त्या’ १४ गावांच्या विकासाचा भुर्दंड नवी मुंबईवर टाकू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कल्याण तालुक्यातील १४ गावांचा विकास करण्यासाठी महापालिका सक्षम आहे. मात्र त्यासाठी लागणारा निधी हा मोठा आहे. या गावांच्या विकासाचा भुर्दंड नवी मुंबईकरांवर पडू नये यासाठी आवश्यक असलेला विकास निधी मिळवण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देश नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी पहिल्याच बैठकीत प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे १४ गावांवरून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला वाद आता आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापौरपदी निवड झाल्यानंतर सुजाता पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांची पहिली बैठक आपल्या दालनात घेतली. या बैठकीला उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपायुक्त किसनराव पालांडे, एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर आदी उपस्थित होते. याच बैठकीत महापौरांनी पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १४ गावांचा मुद्दा उपस्थित केला. या गावांतील दोन प्रतिनिधी महासभेत आले आहेत. त्यामुळे या गावांच्या विकासाचा प्रश्न विचारला जाणार आहे. या गावांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. त्या निधीचा भुर्दंड नवी मुंबईकरांवर पडू नये यासाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या.

गावे राहणार की जाणार?

नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा समावेश हा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हट्टामुळे झाला आहे. ही गावे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा महापालिकेतून वगळण्यात येणार आहेत, असे वन मंत्री गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. आता पहिल्याच बैठकीत महापौर सुजाता पाटील यांनीही या गावांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे ही गावे नवी मुंबईत राहणार की नवी मुंबईतून जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे