नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; शनिवारी आरक्षण सोडत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एप्रिलमध्ये होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रभाग आरक्षण सोडत निवडणूक आयोगाकडून येत्या 1 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये विद्यमान नगरसेवकांपैकी कुणाची विकेट निघणार, कोणाची हॅट्रीक हुकणार आणि कोणाला लॉटरी लागणार याकडे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

महापालिकेची ही निवडणूक 111 प्रभागांमधून होणार आहे. त्यामध्ये महिलांच्या 56 तर पुरुषांच्या 55 प्रभागांचा समावेश आहे. यामध्ये 69 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 30 प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी, 10 प्रभाग एससी आणि दोन प्रभाग एसटी प्रवर्गासाठी असणार आहेत. एससी आणि एसटी प्रवर्गांच्या प्रभागाची सोडत निघणार नाही. ते लोकसंख्येच्या निकषानुसार निवडणूक आयोग ठरवणार आहे. मात्र त्यानंतर या दोन्ही प्रवर्गांमध्ये महिला आणि पुरुष गटासाठी प्रभागांची सोडत काढण्यात येणार आहे. सर्वसाधारण आणि ओबीसी गटातील प्रभागांची निवड ही पूर्णपणे सोडतीमधूनच होणार आहे. ही लॉटरीची प्रक्रिया शनिवारी सकाळी 11 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात पार पडणार आहे.

सूचना, हरकती सोमवारपासून

निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण सोडत काढल्यानंतर  येत्या 3 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचनेची अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच दिवसांपासून प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना घेण्यात येणार असून यासाठीची अंतिम मुदत 10 फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे. आलेल्या हरकती आणि सूचना 12 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहेत. या सूचना आणि हरकत निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयात नागरिकांनी सादर कराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.

अडीच महिन्यांचा कालावधी

एप्रिलमध्ये होणाऱया महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत डिसेंबरमध्येच निघणे आवश्यक होते. मात्र पॅनल पद्धत रद्द झाल्यामुळे ही सोडत सुमारे दोन महिने लांबणीवर पडली. सोडतीच्या प्रक्रियेनंतर सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीसाठी फक्त अडीच महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने त्यांची पुरती दमछाक होणार आहे.