
दारू पिऊन तर्राट असलेल्या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने शनिवारी सायंकाळी करावे गाव परिसरात मोठा धुमाकूळ घातला. दारूच्या नशेत त्याने इनोव्हा कार सुसाट चालवून चार वाहनांना जोरदार धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची एकच पळापळ उडाली. नागरिकांनी या पोलीस अधिकाऱ्याला कारमधून बाहेर काढून त्याची जोरदार धुलाई केली आणि त्याला एनआरआय पोलिसांच्या ताब्यात दिले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला आहे. दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या या पोलीस निरीक्षकाचे नाव अरुण पोखरकर असे आहे.
करावे गावातील रस्त्यावरून शनिवारी सायंकाळी सुसाट वेगात जात असलेल्या काळ्या रंगाच्या इनोव्हा कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या कारचा वेग इतका होता की, अपघातानंतर परिसरात मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ कार थांबवून चालकाला बाहेर काढले. यावेळी चालक पूर्णपणे नशेत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
ओळखपत्र व पोलीस पाटी
कारची झडती घेतली असता, त्यामध्ये अरुण बबन पोखरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई पोलीस) या नावाचे ओळखपत्र आणि पोलिसांची पाटी सापडली. संतापलेल्या जमावाने मद्यधुंद चालकाला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या एन.आर.आय. पोलिसांनी मद्यधुंद कारचालकाला ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांनी मद्यधुंद कारचाल काबाबत अधिक माहिती घेतली असता, तो निवृत्त पोलीस अधिकारी अरुण पोखरकर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले.





























































