मनी, मसल पॉवर, प्रचंड दबाव तरीही शिवसेना-मनसेचे उमेदवार फुटले नाहीत; नवी मुंबईत सत्ताधाऱ्यांना धक्का बसेल; महापालिकेवर भगवाच फडकेल

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पनवेलमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी झालेले प्रयोग नवी मुंबईतही करण्यात आले. मनी मसल पॉवरचा पुरेपूर वापर करून आमच्या उमेदवारांवर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला. मात्र या दादागिरीला आणि दडपशाहीला बळी न पडता शिवसेना आणि मनसेचे उमेदवार फुटले नाहीत. नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपकडे फक्त कंत्राटदारांची गँग असून आमच्याकडे सर्वसामान्य निष्ठावंतांची फौज आहे. त्यामुळे कोणी कितीही दावे केले तरी नवी मुंबई महापालिकेवर शिवसेना-मनसे शिवयुतीचा भगवा फडकवणारच आहे, असा विश्वास दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज व्यक्त केला.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसेच्या वतीने आज वाशी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले की, भाजप आणि शिंदे गटाने नवी मुंबईची पूर्णपणे वाट लावली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपुत्रांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचे काम केले आहे. गरजेपोटी घरे नियमित करण्याचा जीआर काढण्यात आला. मात्र एकही घर नियमित झाले नाही. असा घणाघातही दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

याप्रसंगी जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, अतुल कुळकर्णी, बाबू मोरे, मनसेचे विलास घोणे, सविनय म्हात्रे, सचिन कदम, अभिजित देसाई आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य कार्यकर्ता मैदानात

भाजप आणि शिंदे गटाने धनदांडग्यांचा कुटुंबकबिला निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना आणि मनसेने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना आणि मनसे शिवयुतीचे ९५ शिलेदार रिंगणात उतरले आहेत. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आमच्या सर्वच उमेदवारांवर धनदांडग्यांनी उमदेवारी मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला होता. विविध गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्याही त्यांना दिल्या जात होत्या, असा आरोप यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केला.