पूजा खेडकरांच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक

अपघातानंतर मिक्सरचालकाचे नुकसानभरपाईसाठी नवी मुंबईतून अपहरण करून त्याला पुणे येथील बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांचा वाहनचालक प्रफुल्ल साळुंखे याच्यावर झडप घातली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर साळुंखे हा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे गेला होता.

मुलुंड-ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर आणि एका कारचा किरकोळ अपघात झाला होता. कारचालक प्रफुल्ल साळुंखे आणि पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी कारची नुकसानभरपाई दिली नाही म्हणून मिक्सरचालक प्रल्हादकुमार चौहान याचे अपहरण करून पुण्याच्या औंध येथील बंगल्यात डांबून ठेवले होते. याप्रकरणी दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.