
विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांमध्ये नाव एकाचे, फोटो दुसऱयाचाच अशा भयंकर चुका करणाऱया निवडणूक आयोगाचा आणखी एक कारनामा नवी मुंबईत उघडकीस आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रशासनाने गोंधळ घातला असून मतदारांची हजारो नावे गायब करण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्या हक्काच्या मतदारांची नावे शोधताना इच्छुक उमेदवारांना टेन्शन आले आहे. त्यामुळे दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी घेताना प्रशासनाची दमछाक होणार आहे.
नवी मुंबई शहरात एकूण 111 प्रभाग आहेत. त्यामध्ये 366 मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. जनगणना न झाल्यामुळे प्रभाग रचनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही, फक्त आरक्षण बदलले आहे. मात्र प्रशासनाने मतदार याद्या तयार करताना कमालीचा गोंधळ घातला आहे. नेरुळ येथील प्रभाग क्रमांक 96 मधील हजार मतदार गायब केले आहेत. प्रभाग क्रमांक 85 मधील सारसोळे गावातील सुमारे बाराशे मतदारांची नावे दुसऱया प्रभागात टाकण्यात आली आहेत. नेरुळमधील मतदार याद्यांची पुनर्रचना 2015 साली झालेल्या महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर करण्यात यावी, अशी मागणी शहरप्रमुख विजय माने आणि विभागप्रमुख तानाजी जाधव यांनी केली आहे.
चुकांची दुरुस्ती केलीच नाही
विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये अनेक चुका होत्या. हजारो नावे बोगस आढळून आली होती. काही ठिकाणी नाव एका व्यक्तीचे आणि छायाचित्र दुसऱयाच व्यक्तीचे लावण्यात आले होते. या सर्व चुका निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांची दुरुस्ती झाली नाही, हा प्रकार फार गंभीर आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी तयार करताना या चुकांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी खासदार राजन विचारे आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नेरुळ, शिवाजीनगर येथील नगरसेविका कविता आगोंडे व बेलापूरच्या सुरेखा नरबागे यांनी भाजपला राम राम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, शहरप्रमुख विजय माने, अशोक नरबागे, विभागप्रमुख अरुण गुरव, सुनील सातपुते, चंद्रकांत आगोंडे आदी उपस्थित होते.



























































