वसीम रिझवींवर कारवाई करा, नवाब मलिक यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या निषेधार्थ देशात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. महाराष्ट्रातही बंद पुकारला. देशातील सलोखा कसा बिघडेल यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत. पुस्तके लिहिली जात आहेत. विधाने केली जात आहेत. लोकांच्या भावना दुखावण्याचे काम सुरू आहे. नियोजित पद्धतीने देशातील वातावरण कसे बिघडेल हे वसीम रिझवींच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणूनच रिझवी यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

वसीम रिझवी हे शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन होते. त्यात त्यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करून नवाब मलिक पुढे म्हणाले की, त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात तक्रारही दाखल झाली आहे. शिया समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले, पण सीबीआयने यामध्ये कोणतीही कारवाई केली नाही. या वसीम रिझवींना मोकळीक देण्यात आली असून त्यामुळे वातावरण बिघडत आहे. रिझवींवर कारवाई करावी. भविष्यात कोणतीही विधाने किंवा त्यांच्या लिखाणामुळे देशातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले.

आंदोलनाला हिंसक वळण नको

आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे, पण त्याला हिंसक वळण लागू देता कामा नये. हिंसक आंदोलनाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. लोकांनी शांतता ठेवावी. पोलीस कायदा सुव्यवस्था राखतील. हिंसाचार होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. माथी भडकविणाऱयांचे ऐकू नका, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले.