
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीकडे घरकाम करणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत सदर महिलेने त्याच्यावर आरोप केले होते. त्यावरून नवाजुद्दीनची पत्नी आलिया हिच्या वकिलांनीही ट्वीट केलं होतं. या दरम्यान, या महिलेचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ती माफी मागताना दिसत आहे.
या महिलेचं नाव सपना रॉबिन आहे. सपना हिचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तिने नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केले होते. तिच्या आरोपांनुसार, नवाजुद्दीनने तिला दुबईत एकटं टाकलं होतं. तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी काहीही नव्हतं. कृपया माझा पगार द्या आणि मला इथून बाहेर काढा. मला हिंदुस्थानात परत जायचं आहे. मला तिकिटाचे पैसे द्या, असं ती म्हणाली होती. त्यानंतर नवाजुद्दीनची पत्नी आलिया हिच्या वकिलांनीही नवाजुद्दीनविरुद्ध ट्वीट्स केले होते.
आता सपनाने पुन्हा व्हिडीओ करून माफी मागितली आहे. ती म्हणाली की, मी नवाज सरांची हात जोडून माफी मागते. खरंतर मी माफीच्या योग्यतेची नाही. मी जे केलं ते दबावातून केलं. तुमच्यासोबत काही चुकीचं व्हावं असं मला वाटत नाही. तुम्ही खूप चांगले माणूस आहात. जे झालं त्यासाठी मी माफी मागते. सोशल मीडियावर जो व्हिडीओ तुम्ही पाहिलात तो चुकीचा होता. तुमच्यावर मॅडमने केलेले आरोप खोटे आहेत. मी तुम्हाला सांगेन की तु्म्ही घरी परत या, असं ती या व्हिडीओत म्हणाली आहे.





























































