
सामना ऑनलाईन । रायपूर
आम्हाला दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांना मारायचं नव्हतं. पण चकमकीवेळी ते तिथे उपस्थित असल्याने त्यांना गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. मीडियाला टार्गेट करण्याचा आमचा हेतू नव्हता, असा खुलासा नक्षलवाद्यांनी एका पत्राद्वारे केला आहे. तसंच या घटनेनंतर आमच्या पक्षाच्या विरोधात दूष्प्रचार केला जात आहे. आमची बदनामी होत आहे, त्याचे खंडन करण्यासाठीच आम्ही हे खुलासा करत आहोत असंही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गावांवर हल्ले करणे, गोरगरीबांना मारहाण करणे, खोट्या तक्रारी दाखल करून अटक करणे, आत्मसमर्पणचा बनाव करण्यासाठी गावकऱ्यांना जबरदस्तीने नक्षलवादी असल्याचे कबुल करायला लावणे, असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. याविरोधातच आम्ही लढा देत आहोत असा दावाही त्यांनी केला आहे.
तसेच मीडिया प्रतिनिधींनी या भागात स्वतंत्र यावे, पोलिसांसोबत येऊ नये. विशेषत: विधानसभा निवडणुकांच्या काळात याविषयी दक्षता घ्यावी. आमचा मीडियाला विरोध नाही, पण पोलिसांसोबत येऊ नका, अशी विनंती त्यांनी यापत्रातून केली आहे.
Naxals release a statement on Dantewada attack, saying ‘DD Cameraman Achutyanand Sahu was killed after being caught in the ambush and we had no intention of targeting the media.’ pic.twitter.com/bAoEQ8ScaS
— ANI (@ANI) November 2, 2018
छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका उधळून टाकण्याचा कट माओवादी नक्षलवाद्यांनी रचला असून, 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी रक्तरंजित हिंसाचार घडवला. दंतेवाडा जिह्यात निलावया गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट आणि गोळीबार करत हल्ला केला. त्यात दोन पोलीस शहीद झाले. यावेळी निवडणुकीचे रिपोर्टिंग करण्यासाठी आलेल्या डीडी न्यूजच्या तीन जणांच्या पथकावरही नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यात दूरदर्शन न्यूजचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांचा मृत्यू झाला होता.



























































