
‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या आठवीच्या हिंदी आणि उर्दू पुस्तकातील ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आज विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. या वेळी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत केंद्राला पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
विधान परिषदेत आज सतेज पाटील यांनी एनसीईआरटीच्या पाठय़पुस्तकातील ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळल्याबाबत नियम 93 अन्वये सभागृहाचे लक्ष वेधले. हा विषय मराठा साम्राज्याच्या नकाशाच्या संदर्भातील आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात संबंधित व्यक्तीला 7 जानेवारी 2026 रोजी उत्तर मिळालेले आहे. तसेच 30 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व्यापक स्वरूपात अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी सीबीएसईला विनंती करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे. त्याच अनुषंगाने एनसीईआरटी यांच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात शिवरायांवर ‘द राईज ऑफ महाराष्ट्र’ या धडय़ाचा समावेश करण्यात आला आहे. पण जेव्हा हा धडा तयार करण्यात आला आणि त्याबाबत चर्चा झाली, तेव्हा त्या नकाशातील त्रुटी सरकारच्या लक्षात आल्या नव्हत्या का, असा सवाल पाटील यांनी केला. या वेळी शिवसेना आमदार ऍड. अनिल परब, सचिन अहिर, सुनील शिंदे, शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी आदींनी या वेळी सरकारला धारेवर धरले. या वेळी विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी अशी जोरदार घोषणाबाजी केली.
सुधारणेसाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार
याआधी एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त दोन ते अडीच पानांमध्ये होता. यापूर्वीच्या काळातील मोगलांचा, पेशव्यांचा, वेस्ट इंडिया कंपनीचा इतिहास होता. तो कमी करून बावीस पानांमध्ये पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांवर विस्तृत असा इतिहासाचा समावेश करण्यात आल्याचे शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले. मात्र मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी मराठा साम्राज्याचा हा अवमान असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. केंद्र सरकारला पत्राद्वारे लेखी विनंती केल्याचे भोयर म्हणाले.





























































