कांद्याच्या निर्यातशुल्क वाढीविरोधात पाथर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; केंद्राच्या प्रतिकात्मक पुतळ्याला घातला कांद्याचा हार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकरण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला कांद्याचा हार घालून निषेध नोंदवला. सकाळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगवान दराडे माजी नगरसेवक बंडू बोरुडे,सीताराम बोरुडे,डॉ. राजेंद्र खेडकर,योगेश रासने,देवा पवार आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार शाम वाडकर यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करावे, अशी मागणी करणारे निवेदन दिले व त्यानंतर कार्यकर्ते नाईक चौकात जमा झाले. त्यांनी केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत पुतळयाला कांद्याचा हार घालत आपला निषेध नोंदवला.

या वेळी बोलताना राजळे म्हणाले की, सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी आधीच चिंतातुर झाला आहे. आता कांद्याच्या रूपाने दोन पैसे हातात येतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र केंद्र शासनाने निर्यात शुल्क भरमसाठ वाढवल्याने कांद्याचे भाव गडगडले असून याबाबत शेतकऱ्यांचा आम्हाला कळवळा आहे असे म्हणणारे राज्यशासनही या विषयावर शेतकऱ्यांच्या बाजूने बोलण्यास तयार नाही. तातडीने हे शुल्क कमी करावे अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजळे यांनी दिला आहे.