…म्हणून मी सातवेळा निवडून आलो; अजित पवारांनी सांगितले विजयाचे रहस्य…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणुकीतील त्यांच्या विजयाचे रहस्य सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपल्या खास शैलीत त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनाही काही सल्ले दिले आहेत. निवडणुकांमध्ये जे राजकारण करायचं ते आपण करू. आपआपल्या पक्षांची ध्येयधोरणं मांडू, पण संस्था चालवताना हा जवळचा, हा लांबचा असं करायचं नाही, असे अजित पवार म्हणालेय

अजित पवार म्हणाले, खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकांमध्ये जे राजकारण करायचं ते आपण करू. आपआपल्या पक्षांची ध्येयधोरणं मांडू. लोकांना ज्यांचं पटेल त्यांच्या मागे लोकं उभे राहतील, पण संस्था चालवताना हा जवळचा, हा लांबचा असं करायचं नाही. सर्व शेतकरी समाज आपला आहे. कुणीच कुणाचा कायमचा बांधिल नसतो. आपण चांगलं काम केलं, लोकांना विश्वास दिला, तर लोक आपल्या मागे उभे राहतात. मी सातवेळी बारामती मतदारसंघातून निवडून आलो. यावेळी मी एक लाख 65 हजार मताधिक्याने निवडून आलो. सर्व विरोधी उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. का झाली? कारण, मी तिथं भेदभावच करत नाही, असे विजयाचे रहस्य अजित पवारांनी सांगितले.

एखाद्याने निवडणुकीत माझ्या विरोधात काम केलं आणि मी निवडून आलो तरी त्यांची कामं करतो. मी निवडून आल्यावर संपूर्ण मतदारसंघाचा आमदार होतो. त्यावेळी मी विरोधी काम करणाऱ्यांचंही काम करण्याचा प्रयत्न करतो. तेच नंतर म्हणतात यांना मतदान न करताही यांनी काम केलं, पुढच्यावेळी यांनाच मतदान करायचे. आपले काम असे असते, असेही ते म्हणाले. कुठेच कुणाची मक्तेदारी नसते. लोकं कोणाचं नेतृत्व चांगलं आहे, कुणाचे विचार चांगले आहेत, कुणाची कामाची पद्धत चांगली आहे, हे पाहतात, असेही त्यांनी सांगितले.