
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेसोबत गद्दारी केल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीने निधी देण्याबाबत सतत शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय केला. बंडखोरी होण्यामागेही हेच कारण असल्याचे मिंधे गटातील आमदार सतत आरोप करतात. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “हा धादांत खोटा आरोप आहे. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेला गट, बंडखोरीचे कारण सांगण्यासाठी असे बोलतात. एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
“देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्षनेते होते. ते म्हणायचे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला इतका-इतका निधी मिळाला. मग परवाच्या पुरवणी मागणीत 83 टक्के रक्कम देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांच्या विभागाला देण्यात आला. तर, शिंदे गटातील मंत्र्यांच्या विभागाला केवळ 17 टक्केच रक्कम मिळाली,” असे पवार म्हणाले.
“जलसंपदा, नगरविकास, ग्रामविकास, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाला तुम्हाला पैसे द्यावेच लागतात. त्याशिवाय विकासकामे करू शकत नाहीत. आता आम्ही म्हणायचं का एकनाथ शिंदेंना कमी आणि भाजपाला जास्त पैसे मिळाले. शेवटी विभाग कोणाकडे असतो हे महत्वाचं आहे,” अशी स्पष्टोक्ती पवारांनी दिली.
आजच्या अर्थसंकल्पावर अजित पवार म्हणाले की अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आपण पाहिला. खरंतर हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकराचा चुनावी जुमला आहे. यात आपल्याला दूरदृष्टीचा अभाव जाणवेल. तसेच वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे. या राज्यात अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी 9 वेळा आणि मी स्वतः ७ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
याचवेळी पवार म्हणाले की, 1 एप्रिलला नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. एप्रिल फुल नाही, तर झटकाच बसणार आहे. 30 ते 35 टक्के विजेची दरवाढ होणार आहे. फक्त ते मी आता सांगत नाही. अर्थसंकल्प झाल्यावर सांगेन, असं ते म्हणाले. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे असंही पवार यावेळी म्हणाले.


























































