अकाली दलाचे अभिनंदन! शरद पवारांचे ट्विट

‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय शिरोमणी अकाली दलाने घेतला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अकाली दलाचे अभिनंदन केले आहे.

कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय आपण घेतला त्यासाठी तुमचे अभिनंदन. शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल आभार, असे ट्विट शरद पवार यांनी केले असून त्यात अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल, पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, खासदार हरसीमरत कौर बादल यांचाही नामोल्लेख आहे. पवार यांचे हे ट्विट राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

दहा महिन्यांत दुसरा धक्का

दहा महिन्यांपूर्वी शिवसेनेने भाजपची साथ सोडताना केंद्र सरकारमधून बाहेर पडत एनडीएलाही राम राम ठोकला. त्यामुळे एनडीए खिळखिळी झालेली असतानाच अकाली दलानेही भाजपला दुसरा धक्का दिला आहे. कृषी विधेयकांचा निषेध आणि विरोध करत हरसीमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि शनिवारी पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आणि तितकाच भाजपची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.

शिवसेनेनेही केले अकाली दलाचे अभिनंदन

अकाली दल एनडीएतून बाहेर पडला त्याबद्दल शिवसेनेनेही अभिनंदन केले आहे. शेतकऱयांच्या हितासाठी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला त्याचे शिवसेना स्वागत करत आहे, असे ट्विट शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांविरोधात देशभरात शेतकऱयांची आंदोलने सुरू असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या तिन्ही विधेयकांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी देशाच्या विवेकहिताच्या दृष्टीने कृती करण्यास नकार दिला असून हिंदुस्थानसाठी हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या