
देवेंद्र फडणवीस दुर्लक्षित आहेत. त्यांना सध्या काही उद्योग नाही आणि करण्यासारखेही काही नाही. त्यांच्याकडे भरपूर वेळ असल्याने प्रसिद्धीसाठी ते काहीही बोलतात, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी लगावला.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल बैठकीसाठी खासदार शरद पवार शनिवारी साताऱ्यात आले होते. देश संकटात असताना केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तू महाग करीत चालले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होतो आहे. लॉकडाऊनमुळे लोक गप्प आहेत, ते सहन करत आहेत, याचाच केंद्र सरकार गैरफायदा घेत आहे, असा आरोपही पवारांनी केला.
डिपॉझिट जप्त झाले त्यांची काय नोंद घ्यायची?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आज पत्रकारांनी छेडले असता पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ज्या ठिकाणी उभे राहिले, तिथे डिपॉझिट जप्त झाले, अशांची कशाला नोंद घ्यायची? ज्यांना जनतेने वारंवार नाकारले, त्यांच्याबाबत काय प्रतिक्रिया द्यायची? त्यांना लोकांनीच त्या-त्या वेळेला उत्तर दिले आहे. सोडून द्या’, अशा शब्दांत पवार यांनी पडळकर यांचा नामोल्लेख न करता बेदखल केले.
राजू शेट्टींना विधान परिषदेवर घेणे ही माझी जबाबदारी
‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांचा शेती क्षेत्रातील अभ्यास आहे. शेतकऱयांचे प्रश्न विधिमंडळात मांडले जावेत व त्याद्वारे शेतकऱयांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी त्यांचे राजकीय पुनर्वसन करून त्यांना विधान परिषदेवर घेणे ही माझी जबाबदारी होती. ही जबाबदारी मी पूर्ण केली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.





























































