
राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून गळती लागली असून अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम करत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची अग्नि–शमन बैठक पुण्यात शुक्रवारी पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिक पडझड होऊ नये तसेच ज्या ठिकाणी गडबड होण्याची शक्यता आहे तेथे प्लॅन बी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि आमदार पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षात सामील होत आहेत. त्यातच इंदापूरच्या जागेवरून काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरच तोफ डागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बारामती हॉस्टेल येथे पार पडली. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून पक्षाला सोडचिठ्ठी देणार म्हणून चर्चा सुरू असलेले छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जीव काहीसा भांडय़ात पडला.
काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात दोन्ही पक्षांत 220 जागांवर एकमत झाले असून अन्य जागांवर चर्चा सुरू आहे. ज्या जागांवर एकमत झाले त्या जागांवरील संभाव्य उमेदवारांच्या नावांवर शुक्रवारी प्राथमिक चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त इच्छुक असतील अशा ठिकाणी मेरीटवर निर्णय करण्यात यावा. मात्र हे करत असताना उमेदवारी मिळाली नाही म्हणून कुणी नाराज होऊन पक्षविरोधी भूमिका घेणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इंदापूरच्या जागेचा निर्णय वरिष्ठ पातळीवर
इंदापूर जागेचा निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे ठरले आहे. त्याआधीच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसवर रोष व्यक्त करीत आहेत हे दुर्दैवी आहे. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत खुलासा केला असल्याचे पाटील म्हणाले.
उदयनराजे राष्ट्रवादीतच
खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन करायची गरज नाही. त्यांनी पक्ष सोडण्याची भाषा केलेली नाही, असे जयंत पाटील यांनी उदयनराजेंच्या प्रश्नाबद्दल बोलताना स्पष्ट केले.
विधानसभेसाठी 813 जण इच्छुक
विधानसभेच्या उमेदवारीसाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून 813 जण इच्छुक आहेत. यासंदर्भात संबंधित जिह्यातील पदाधिकाऱयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, नेते पक्ष सोडून गेले तरीही पक्षाचे बळ वाढवणारे चांगले नेते आमच्याकडे आहेत, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.























































