ममता-केजरीवाल यांच्यापेक्षा शरद पवार उजवे, पण तरी…; अजित पवारांच्या भाषणाची तुफान चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं. यावेळी निमंत्रित पदाधिकाऱ्यांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्याच स्टाइलमध्ये भाषण केलं. आजच्या भाषणात त्यांनी अनेक गोष्टी कटू शब्दात मांडल्या. त्यांच्या या भाषणाची चर्चा आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातही रंगू लागली आहे.

आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले की, ‘मलापण खूप काही बोलता येतं, साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. मी कुणाचा अपमान करण्यासाठी इथे भाषण करत नाही. माझ्या मनाला दु:ख आहे. विचार करा की ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर प. बंगाल जिंकतात. केजरीवाल दोन राज्य मिळवतात, नितीश कुमार देखील बिहारमध्ये वर्चस्व निर्माण करतात. आंध्र, तेलंगणा मध्ये तेच बघायला मिळतं. याच्यात सगळ्यात उजवा नेता हे शरद पवार साहेब आहेत. पण आपण आपल्या एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष निवडणून आणला का? आपणच कमी पडलो’.

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘आज देखील मुंबईत, विदर्भात काय स्थिती आहे. अजूनही मुंबईला अध्यक्ष नाही’. आपल्याला दिल्लीला विचारायला जायचं आहे का? असा टोला लगावत त्यांनी निर्णय तर महाराष्ट्रातच घ्यायचाय असं सांगितलं. साहेब आणि मान्यवरांशी चर्चा करायची. का आपण कमी पडलो? कोकणात आपण वर्चस्व निर्माण केलं? असे सवाल त्यांनी केलं. आपण आनंद साजरा करताना आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

‘मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवली पाहिजे असं सांगितलं. त्यातूनच येणाऱ्या निवडणुका लक्षात घेत खासदार प्रफुल पटेल आणि सुप्रीया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. त्यांचं अभिनंदन करतो’, असं  अजित पवार म्हणाले.

25 वर्षात मागे वळून पाहिलं तर किती जणांना आपण आपलं केलं. कोण कधी संघटनेत आलं याला महत्त्व नाही, असं ते म्हणाले.

‘पक्षाचे विविध सेल आहेत. त्यामध्ये काही बदल करायचा आहे की नाही. किती वर्ष तसंच ठेवायचं. पस्तीशीवाले ते पार चाळीशीला गेले. आता बदल करा. मी इतक्यावेळा सांगतो की त्यात कुणाचे इंट्रेस्ट अडकले आहेत ते तरी मला कळू द्या. भाकरी फिरवायची झालं तर भाकरी फिरलीच पाहिजे. ज्यांचं वयोमान झालं त्यांना फादर राष्ट्रवादी मध्ये घेतलं पाहिजे’, असंही ते म्हणाले.

पदाचा आणि सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरला तर निश्चित वेगळं चित्र उभे राहिलं. भाषणं देऊन पहिला नंबरचा पक्ष होणार नाही. तुम्हा भाषणातून स्फूर्ती, जोश मिळेल. परंतु बोलणाऱ्याने पण आपण किती भागात जातो, आपल्या जिल्ह्यात तरी आपण एकोपा ठेवला आहे का? याचंही आत्मचिंतनात्मक परीक्षण केलं पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी स्वपक्षीयांना मारला.