
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख यांनी मंगळवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. समीर देशमुख राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. तसेच बराच काळ वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष राहीले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत समीर देशमुख यांनी वर्धा लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस यांच्याविरोधात जाहीररित्या प्रचार केला होता. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करतील, अशी चर्चा होती. मंगळवारी पत्नी प्रियंका देशमुख यांच्यासह त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. सुरेश देशमुख विदर्भाच्या सहकार क्षेत्रात दिग्गज नेते आहेत. त्यांच्याच मुलाने शिवबंधन बांधल्यामुळे वर्धा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढणार आहे.देवळी-पुलगाव मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




























































