
सामना प्रतिनिधी । बीड
भाजपशी जवळीक वाढलेले आणि राष्ट्रवादीपासून दुरावलेले बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून जयदत्त क्षीरसागर यांनी दिल्लीत होणाऱ्या तेली समाजाच्या भव्यदिव्य एकता संमेलनास उपस्थित राहाण्याचे निमंत्रण दिले आहे. ही भेट निमंत्रणाची असली तरी गेल्या काही महिन्यापासून जयदत्त क्षीरसागर भाजपशी जुगाड साधत असल्याच्या प्रयत्नाने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडत आहे.
दिल्लीमध्ये तेली समाजाचे ऐतिहासिक अधिवेशन आगामी काळात होत आहे. या अधिवेशनाचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे अध्यक्ष आहेत. अधिवेशनासाठी तीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातील समाज बांधव दिल्लीत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण दिले आहे आणि हे निमंत्रण त्यांनी स्विकारल्याचेही बोलले जात आहे.
दिल्लीत होणाऱ्या तेली समाजाच्या शक्ती प्रदर्शनानिमित्त या संमेलनाचे अध्यक्ष असणारे जयदत्त क्षीरसागर आपले राजकीय वलय अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. थेट नरेंद्र मोदींना निमंत्रण देवून जयदत्त क्षीरसागर भाजपाच्या जवळ जात असल्याचे बोलले जात आहे. चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता चहा पाण्यासाठी क्षीरसागरांच्या बंगल्यावर पोहचले होते. तेव्हापासूनच क्षीरसागरांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या चर्चिल्या जात होत्या. क्षीरसागर आणि भाजपाची सलगी वाढत असल्याने राष्ट्रवादीमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.



























































