
प्रफुल्ल पटेल यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. एवढी मोठी जबाबदारी देऊनही प्रफुल्ल पटेल हे बंडखोरी करत अजित पवार गटासोबत गेले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 1985 पासून 2023 पर्यंत प्रफुल्ल पटेल यांना दिल्या गेलेल्या पदांचा पाढाच त्यांनी पढला असून त्यावरून त्यांनी का पत्करली तुम्ही गुलामी? असा सवाल पटेलांना केला आहे.
”प्रफुल्ल पटेल, शरद पवार यांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली. जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही”, असा टोला रोहित पवार यांनी ट्विटरवरून त्यांना लगावला आहे.
प्रफुल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली… जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच… pic.twitter.com/wT9js2kcph
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2023
या ट्विटसोबतच त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना आतापर्यंत पक्षाकडून कोण कोणती पदं देण्यात आली याची माहितीही एका फोटोतून दिली आहे. त्या फोटोतून त्यांनी पटेलांवर निशाणा साधला आहे. ” अजून काय पाहिजे? साहेब, आपले वडील मनोहरभाई यांच्या निधनानंतर पवार साहेबांनी आपल्यावर दाखवलेलं प्रेम आणि माया ही सर्वश्रुत आहे. पवार साहेबांचा सखा सोबती म्हणून आपली राजकारणात ओळख होती. पण असं काय झालं की, आपल्याला मोठं करणाऱ्या आपल्याच गुरूला आपण फसवलं ?” 1985 – गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड, 1991 – पहिल्यांदा लोकसभेवर निवड , 2000 – राज्यसभा खासदार, 2006 – पुन्हा राज्यसभा खासदार, 2009 – लोकसभेवर निवड, 2016 – लोकसभेला पराभूत झाल्यावर राज्यसभा खासदार, 2004-2011 – केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, 2012 -22 – अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष, जून 2023 – पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड. हे सगळं वाचल्यावर लोकं म्हणतील की, असा अन्याय आमच्यावर पण व्हायला पाहिजे.” असा टोलाही रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना लगावला आहे.































































