शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम, विधिमंडळात गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षकांना यापुढे शिकवण्याशिवाय इतर कोणतेही काम लावण्यात येणार नाही, असे राज्य शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. आता मात्र कहरच झाला आहे. शिक्षकांना कुत्रे मोजायचे काम दिले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत केला.

राज्यामध्ये शिक्षकांकडे असलेली शैक्षणिक कामे काढावी. शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम ठेवावे. अनेक शिक्षक संघटना अनेक शिक्षक लोकप्रतिनिधी देखील यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करतात. आता तर कहरच झाला आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यामध्ये एकीकडे शिक्षकांना आपण मानाचे स्थान देतो आणि दुसरीकडे आपण त्यांना कुत्रे मोजायचे काम लावतो. त्याचबरोबर इतरही अशैक्षणिक कामे त्यांना लावली जातात. निवडणुका असो किंवा मतदार यादी दुरुस्ती अशी सगळी कामे शिक्षक करतात. स्वच्छतागृहे मोजायची असली तरी शिक्षक दिसतात. सरकारकडे इतक्या यंत्रणा आहेत, इतर कर्मचारी आहेत त्यांना काम नसते, तरी त्यांना कामाला लावले जात नाही, अशी खंत काळेंनी सभागृहात मांडली.

सरकार म्हणतेय, ‘गणना नाही, फक्त देखरेख’    

आमदार काळे यांचे आरोप शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तातडीने फेटाळले आहेत. ‘शाळा परिसरात स्वच्छता राखणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार अनिवार्य आहे. शाळेच्या आवारात उघडय़ावर अन्नपदार्थ पडलेले असतील, तर त्यांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत, जेणेकरून भटक्या प्राण्यांचा वावर कमी होईल. शिक्षकांना कुठेही कुत्र्यांची मोजणी करणे किंवा त्यांना पकडण्याचे आदेश दिलेले नाहीत,’ असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.