राष्ट्रवादीचे मोहम्मद फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राबाहेर घडय़ाळ चिन्हावर जिंकून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील एकमेव खासदार मोहम्मद फैजल यांच्या अपात्रतेचा आदेश लोकसभा सचिवालयाने मागे घेतला आहे. फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.

खासदार मोहम्मद फैजल यांना हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुह्यात 11 जानेवारी रोजी केरळच्या कारवट्टी येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याच दिवसापासून त्यांना अपात्र ठरवण्यात येत असल्याची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने 13 जानेवारी रोजी जारी केली. हे प्रकरण नंतर केरळ उच्च न्यायालयात गेले. 25 जानेवारी रोजी केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.

त्यानंतर लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेविरुद्ध फैजल यांनी अॅड. के. आर. शशिप्रभू यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली असतानाही लोकसभा सचिवालय अधिसूचना मागे घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत नमूद केले होते. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच लोकसभा सचिवालयाने फैजल यांच्या अपात्रतेचा आदेश मागे घेतला आहे.