अटक करा, अटक करा, अर्णब गोस्वामीला अटक करा! राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्णबच्या कार्यालयासमोर आंदोलन

‘गलीगली मे शोर है, अर्णब गोस्वामी चोर है’, ‘अटक करा, अटक करा, अर्णब गोस्वामी याला अटक करा’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाबाहेर आज जोरदार आंदोलन केले.

अर्णब गोस्वामी याने देशाच्या सुरक्षेचे धिंडवडे काढले असून त्याला देशाची गोपनीय माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर करावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. अर्णब गोस्वामीला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने त्याचा चॅनेलचा टीआरपी वाढविण्यासाठी वापर केला, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तत्काळ अटक करा. गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा, अशी मागणी माजी आमदार विद्या चव्हाण यांनी या आंदोलनावेळी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रवत्ते महेश तपासे, मुंबई विद्यार्धी अध्यक्ष अमाल मातेले आदी सहभागी झाले होते.

आज काँग्रेसचे आंदोलन

अर्णब गोस्वामीचे कृत्य देशाच्या गोपनीयतेचा भंग करणारे तर आहे, हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून, दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्सी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या