बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींची निर्दोष मुक्तता केल्याचा रत्नागिरीत राष्ट्रवादीकडून निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिल्कीस बानो या पीडितेवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील दोषींची निर्दोष मुक्तता केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुजरातमधील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. बिल्कीस बानो हिच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली होती. त्या अकरा दोषींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वसामान्यांना न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही ही अत्यंत चिंताजनक बाब असून या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

गुजरातमधील भाजप सरकारचा निषेध करत रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फलक फडकवत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य बशीर मुर्तूजा, जिल्हा महिला अध्यक्षा विद्या चव्हाण, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा महासचिव नौसीन काझी, राष्ट्रवादींचे जेष्ठ नेते अभिजित हेगशेट्ये,सुदेश मयेकर,शिध्देश शिवलकर, महिला तालुकाध्यक्ष शमीम नाईक , महिला शहर प्रमुख नेहाली नार्वेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.