पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, ‘या’ गोष्टींवर झाली 45 मिनिटे चर्चा

4967

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती पवारांनी मोदींनी दिली असून लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशीही मागणी त्यांनी केली.

परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील 325 तालुक्यातील उभी पिके पाण्याखाली गेली. पावसामुळे 54.22 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली असे पवारांनी म्हटले आहे. तसेच राज्यपालांनी जाहीर केलेली 30 हजार कोटींची मदत अपुरी असून अद्याप ती मिळाली नसल्याचे पवारांनी मोदींना सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपये देण्यात यावे अशीही मागणी पवारांनी केली.

पवारांचे मोदींना पत्र…
दरम्यान, पवारांनी मोदींना पत्र लिहिले आहे, यात त्यांनी मी 2 जिल्ह्यांचा दौरा केला आणि नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली आहे. यावेळी अवकाळी पावसाची झळ संपूर्ण महाराष्ट्राला बसली आहे, असे निदर्शनास आले. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचाही समावेश आहे. मी यासंबंधी सविस्तर माहिती घेत असून तुमच्याकडे लवकरात लवकर पाठवून देईन, असे नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या