भाजपचे 14 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात! जयंत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या 8-10 आमदारांना गळाला लावण्याचे भाजपचे ‘ऑपरेशन ब्लू लोटस’ फसले, तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपचे 13-14 आमदार संपर्कात आहेत. त्यांचे आमच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांची कामे आम्हाला करावी लागतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने भाजप वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचे सगळे मनसुबे उधळले जात आहेत. त्यातच जयंत पाटील यांनी आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱयांचा जोरदार समाचार घेतला. विधिमंडळ आवारात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्षातील 13 ते 14 आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी आमचे जुने संबंध असल्याने त्यांची कामे आम्हाला करावी लागतात. त्यांची मानसिकता आम्हाला जवळून कळलेली आहे. तरीही अशा प्रकारे पक्ष फोडणे योग्य नाही याची महाराष्ट्राने नोंद घेऊन भाजपला धडा शिकवलेला आहे. ती चूक करण्याची आमची इच्छा नाही. सरकार टिकवणे याकडे आमचे जास्तीत जास्त लक्ष आहे.

सत्तेसाठी भाजप हपापलेला

मध्य प्रदेशमधील ऑपरेशन ब्लू लोटसविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, सत्तेसाठी भाजप हपापलेला आहे. सत्तेत कधी जाऊन बसतो याची स्वप्नं भाजप पहात आहे. त्यामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणात स्वप्नरंजन चालू आहे. जे या पक्षाचं नेतृत्व करताहेत त्यांना आपलं सरकार लवकरच येणार आहे अशा आवया उठवाव्या लागतात तोच हा प्रकार आहे, असा टोला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज भाजपला लगावला.

परभणीत सीएएविरोधात ठरावः नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची भाजपतून हकालपट्टी

परभणी जिल्ह्यातील सेलू आणि पालम नगर परिषदेत भाजपची सत्ता असताना सीएएविरोधात ठराव मंजूर करून तो थेट केंद्र सरकारला पाठविण्यात आला. याची गंभीर दखल घेत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालम नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांची पदावरून आणि पक्षातून हकालपट्टी केली आहे.

आमदार मेघना बोर्डीकरांच्या भूमिकेकडे लक्ष

सीएएविरोधी ठराव केला म्हणून भाजपमधून ज्यांची हकालपट्टी करण्यात आली ते विनोद बोराडे आमदार मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. विधानसभा निवडणुकीदरम्यान बोर्डीकर यांनी अठरा नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगराध्यक्ष बोराडे यांची हकालपट्टी झाल्यामुळे आमदार बोर्डीकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनापेक्षा भाजपा भयंकर

ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही तिथले आमदार फोडण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडून नेहमीच होत असतो. त्यासाठी भाजपकडून करण्यात येणारे `ऑपरेशन लोटस’ म्हणजे कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर असून त्याची दक्षता घेतलीच पाहिजे. त्यावर अँटिबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचा टोला काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला. `ऑपरेशन लोटस’ची आम्हाला सवय झाली असून लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष या प्रकाराला कधीही भीक घालणार नाहीत. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गानेच सरकारे चालली पाहिजेत. मग कोणतीही सरकारे असोत, असेही चव्हाण म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या