
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र काम करतील हे कधी कुणाला पटले नसते, पण ते आपण केले. महाराष्ट्रात वेगळ्या विचारांचे सरकार आपण स्थापन केले. आपण दिलेला पर्याय लोकांनी स्वीकारला. तिन्ही पक्ष या पर्यायाच्या बांधिलकीतून योग्यरीत्या पावले टाकीत आहेत. सरकार उत्तमरीत्या काम करीत असून महाविकास आघाडीचे हे सरकार टिकेल, पाच वर्षे काम करेल. नुसती पाच वर्षे नाहीत, तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्र काम करून प्रभावीपणे सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व देशात आणि राज्यात करेल, असा विश्वास व्यक्त करणारे मोठे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले.
राष्ट्रवादीच्या 22व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. 1977मध्ये जनता पार्टीचा प्रयोग झाला पण दोन वर्षांत तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले, पण राष्ट्रवादीने 22 वर्षं पूर्ण केली. सहकाऱयांच्या कष्टाने, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. जनतेचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कधी आपण सत्तेत होतो तर कधी नव्हतो, पण त्याचा फारसा काही परिणाम होत नाही.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामगिरीचे काैतुक
पक्षातून काही लोक गेले पण त्यामुळे नवीन लोक, नवीन नेतृत्व तयार झाले. मंत्रिमंडळातील अनेक जण नवी जबाबदारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत. एरव्ही हे लोकांसमोर आले नसते. देशात एवढे मोठे संकट आले असताना महाराष्ट्रात गंभीर स्थिती होती. संकटाचा सामना करण्यासाठी आणि लोकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी राजेश टोपेंच्या नेतृत्वात आरोग्य खात्याने काम केलं आणि त्याचा परिणाम म्हणजे या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे अशा प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली, अशा शब्दांत शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामगिरीचे काैतुक केले.
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. पण त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे जास्त महत्त्वाचे आहे. याचे 100 टक्के श्रेय पाठीशी उभ्या राहणाऱया सामान्यांचं असून त्यांच्याशी बांधिलकी कायम ठेवली पाहिजे.
शिवसेना विश्वासार्ह पक्ष
मुख्यमंत्री-पंतप्रधान एकांतात भेटले. त्यामुळे काही लोकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. शंका घेतल्या पण शंका घेणारे वेगळय़ा नंदनवनात राहत आहेत, अशा शब्दांत टीकाकारांचा समाचार घेताना शरद पवार यांनी शिवसेना विश्वासार्ह पक्ष असल्याचे स्पष्ट केले.
माझा शिवसेनेविषयीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढे आली. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो, याचा तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला.
कोणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेने ज्या पद्धतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही, असे पवार म्हणाले.
एकाच ठिकाणी राहिली की सत्ता भ्रष्ट होते!
‘मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता अधिक हातांत गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे आणि हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असे वाटले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
































































