राष्ट्रवादीचे भाजप कार्यालयावर ‘गाजर फेको’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp-protest-near-bjp-office

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात सत्तेवर आल्यावर सतत आश्वासनांचे एकीकडे गाजर दाखवत दुसरीकडे वाढती इंधन दरवाढ, लोडशेडिंग, महागाईने लोक त्रस्त झाले आहेत. लोकांना दिलासा देण्याऐवजी फक्त आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज नरीमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयावर गाजर फेको आंदोलन केले.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली. ‘वाह रे मोदी तेरा खेल, घरपोच दारू…महेंगा तेल…’, ‘मोदी सरकार हाय हाय…’ अशा घोषणा देत कार्यकर्ते भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर जमा झाले आणि सोबत आणलेल्या गाजरांचा कार्यालयावर वर्षाव केला. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, लोडशेडिंग,पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि महागाई याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन पुकारले आहे. राज्यभर सरकारविरोधात निषेध मोर्चे सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.