‘एनडीए’त असंतोष, समन्वयक नेमण्याची मागणी

2233

‘एनडीए’मध्ये काहीच आलबेल नाही, प्रचंड असंतोष आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आघाडीतील घटकपक्षही आता भाजपच्या एकाधिकारशाहीविरोधात खुलेपणाने बोलू लागले आहेत. शिवसेनेला आघाडीबाहेर ढकलण्याचा एकतर्फी निर्णय आज भाजपने घेतल्याने हा असंतोष अधिकच उफाळून आला आहे. आघाडी टिकवायची असेल तर समन्वयक नियुक्त करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

‘एनडीए’च्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, आघाडीतील सहयोगी पक्षांचा ताळमेळ असणे आवश्यक आहे. त्यासाठी एक समन्वयक आवश्यक आहे. पहिल्यांदा तेलगू देसम पार्टीने एनडीएची साथ सोडली. नंतर उपेंद्र कुशवाह यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी आघाडीपासून वेगळी झाली याकडेही पासवान यांनी लक्ष वेधले आहे. बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांची जदयु एकत्र असले तरी त्यांच्यातील भांडणाच्या बातम्या वरचेवर येतच असतात. त्यामुळे ‘एनडीए’त असंतोष आहे, असेही पासवान म्हणाले.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात एनडीएला समन्वयक होता. शरद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी ते काम पाहिले आहे. 2013 मध्ये जेव्हा जदयुने आघाडीपासून काडीमोड घेतला तेव्हा शरद यादव यांनी समन्वयक पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हापासून सहयोगी पक्षांची तक्रार आहे की मोदी एनडीएची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतात आणि तक्रार निवारणाचे काम अमित शहा करतात.

एनडीएमध्ये फूट पडणे बरोबर नाही, शिवसेना हवीच
एनडीएमध्ये फूट पडली हे बरोबर नाही. शिवसेना ही एनडीएमध्ये हवी असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. महायुतीला महाराष्ट्रात 225 जागा मिळायला हव्या होत्या पण दोन्ही पक्षांमधील बंडखोरांमुळे चाळीस-पन्नास जागांचा फटका बसला असे आपण एनडीएच्या बैठकीत सांगितल्याचे आठवले म्हणाले. महाराष्ट्रात सर्व काही व्यवस्थित होईल असे अमित शहा यांनी आपल्याला सांगितले आहे, असे सांगतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवणे शिवसेनेसाठी घातक असल्याचे आठवले म्हणाले. बाळासाहेबांना खरी आदरांजली द्यायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडावी असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या