एनडीएच्या नेतेपदी मोदींच्या नावावर एकमत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएनचे सरकार स्थापन केले जाणार आहे. आज दिल्लीत झालेल्या घटक पक्षांच्या बैठकीत मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी 7 जूनची वेळ दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपने मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पार पडली. यावेळी एनडीएतील 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. या सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पेंद्रात सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीस उपस्थित एनडीएच्या प्रमुख नेत्यांनी मोदी यांना पाठिंबा दर्शवत स्वाक्षरीचे पत्र यावेळी सादर केल्याची माहिती जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी दिली.

एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड

एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात येत असल्याचा ठराव करण्यात आला. यामध्ये आम्हा सर्वांना अभिमान आहे की, एनडीएने 2024 ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने लढली आणि जिंकली. एनडीए सरकार देशातील गरीब, महिला, तरुण, शेतकरी आणि शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. भारताचा वारसा जपून आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एनडीए सरकार भारतातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करत राहील, असेही या ठरावात म्हटले आहे.

अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यावर वाटाघाटींची जबाबदारी

लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. चंद्राबाबूंचा टीडीपी 15 जागांसह एनडीएमधील दुसऱया क्रमांकाचा आणि नितीश यांचा जेडीयू 12 जागांसह तिसऱया क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपसाठी यावेळी दोन्ही पक्ष आवश्यक आहेत. त्यांच्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर एनडीतील घटक पक्षांसोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारी भाजपने अमित शहा, राजनाथ सिंहांकडे सोपविली आहे.

मोदींचा राजीनामा; आता काळजीवाहू पंतप्रधान

पंतप्रधान मोदींनी बुधवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. तसेच मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी राजीनामा मंजूर करत 17 वी लोकसभा विसर्जित केली. राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार मोदी नवे सरकार स्थापन होईपर्यंत आता काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील.

जेडीयूची तीन मंत्रीपदांची मागणी

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूने पेंद्रात तीन मंत्रीपदे मिळण्याची मागणी केली आहे. चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोकजनशक्ती पार्टी आणि शिंदे गटाकडून दोन मंत्रीपदाची मागणी केली आहे. त्याचबरोबर जीतनराम मांझी, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल यांनीही मंत्रीपदाची मागणी केली आहे.

उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार

एनडीएच्या सर्व खासदारांची 7 जून रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांची औपचारिकपणे एनडीएच्या नेतेपदी निवड केली जाईल. यानंतर एनडीए राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

टीडीपीला हवे लोकसभेचे अध्यक्षपद

भाजपला लोकसभेत मर्यादित यश मिळाल्याने पेंद्रात सरकार स्थापन करताना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. एनडीएचा घटक पक्ष असणाऱया टीडीपीने सहा मंत्रीपदांसह लोकसभा अध्यक्षपदाची मागणी भाजपकडे केली आहे.