पुरग्रस्तांच्या मदतीला एनडीआरएफची टीम दाखल; १४० गावे बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
छाया - उदय जाधव दुशेरेकर

सामना प्रतिनिधी । कराड

कराड तालुक्यातील पुरस्थितीने आक्राळविक्राळ रुप धारण केले असून पावसाची संततधार सुरुच आहे. कृष्णा – कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. महापूर ओसंडून वाहत असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. कराड शहरातील २७ तर तालुक्यातील १४० गाव बाधीत आहेत. ३५० कुटुंबियांतील १८५० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीला एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.

कृष्णा – कोयना नदीच्या महापुराने कराड शहरात पाणी घुसल्यास दत्तचौक, चैतन्य बाल रुग्णालय, लल्लूभाई चाळ, शाहू चौक, मुख्य बाजारपेठ, यशवंत हायस्कूल, संगम पेट्रोल पंप, बालाजी मंदिर, वाखाण रस्ता अशा चारीबाजुने कराडला पाण्याचा वेढा पडला असुन मोठ्या प्रमाणात व्यापाऱयांचे व नागरिकांचे नुकसान झाले आहे. लोकांच्या सुरक्षेच्या कारणासाठी आज पुण्यावरुन एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. या टीमला प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन पुरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.

दरम्यान कोयना धरणाची 5.30 वाजता असणारी परिस्थिती पाणी पातळी 2161’3″, पाणीसाठा 102.32 (97.21 %) विसर्ग 119777 cusecs, आवक 140147 cusecs, तर वक्रद्वारे उचललेली उंची 16’0″ (दि.6/8/19 संध्याकाळी 4.00 पासुन) पाऊस – महाबळेश्वर 138 mm, नवजा 145 mm अशी आहे. सध्या धरणात 102 tmc (96.91 %) पाणीसाठा आहे. आज दुपारी 4.00 वाजले पासून 6 वक्रद्वारे 14’6″ वरून 16 फुटावर करणेत आली आहेत. त्यामुळे सध्याच्या विसर्गात 8807 cusecs ने वाढ होऊन धरणातून एकूण विसर्ग 119777 असा आहे. धोमधबरणातुन कृष्णा नदी पात्रात सांडव्यावरून 23,000 cusecs ने पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

एनडीआरएफची टीमकडे 2 बोटी व प्रशासनाकडे 2 बोटी असे एकूण 4 बोटी असून या बोटी कराड व पाटण तालुक्यातील लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहेत. या एनडीआरएफच्या टीममध्ये 24 जवान असून या टीमला प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार ही टीम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी काम करणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले आहे.

कृष्णा – कोयना नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तसेच गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक याना मुख्यालयीच थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात ३ हजार कर्मचारी मदतीसाठी कार्यरत असुन कराडच्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे केले आवाहन लोक एकत नाहीत. महापुराचे पाणी पाहण्यासाठी अलोट गर्दी सर्वत्र होत आहे. यामुळे काम करताना प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन स्थिती कायम असल्यामुळे बुधवार 7 ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

गेल्या दहा दिवसांपासून कराड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहेच. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कृष्णा व कोयना नद्यांनी रौद्ररुप धारण केले आहे. प्रीतीसंगमापासून कृष्णेची पाणी पातळी ५० फूट तर, प्रीतिसंगमापासून मागे कोयना नदीची पाणी पातळी ५५ फूट आहे. कराड शहराला पुराचा विळखा बसला असून १४० पूरग्रस्त कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील विविध धरणातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने कराड-विटा मार्गावरील नवीन कृष्णा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील तारळी, धोम, कण्हेरसह सर्व छोट्या-मोठ्या धरणातून कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांसह तारळी, दक्षिण मांड, उत्तर मांड, वांग या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेच कराडमध्ये कृष्णा आणि कोयनेच्या प्रीतिसंगमावरून सुमारे २ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान तत्पूर्वी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दक्षिण मांड नदीवरील वाठारनजीक असलेला पूल खचला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. त्यामुळेच आता कराड तालुक्यातील कृष्णा व कोयना नदीवरील सर्व पूल पाण्याखाली गेले असून तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.