
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
संपूर्ण गुजरात राज्य हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा मोठा गाजावाजा करून झालेली असली तरी गुजरातच्या ग्रामीण भागासाठी अद्यापि लाखो शौचालयांची गरज आहे, अशी माहिती आरटीआयमार्फत विचारलेल्या प्रश्नाला सरकारच्या अनेक जिल्हा प्रशासनांनी दिलेली आहे.
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण योजनेखाली दाहोदमध्ये मे-जूनपर्यंत 1 लाख 40 हजार कुटुंबीयांना शौचालये मिळणे बाकी आहे, असे जिल्हा प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते हितेश छावडा यांना माहिती देताना कळविले आहे.
कोठे किती कुटुंबीयांना शौचालये हवीत ते पुढीलप्रमाणे ः वडोदरा – 17 हजार 874, छोटा उदेपूर 26 हजार 678, कच्छ 14 हजार 878, साबरकांठा 34 हजार 607, पाटण 17 हजार 526, महिसागर 19 हजार 526, अमरेली 21 हजार 320 या जिल्हय़ांत एवढय़ा मोठय़ा संख्येतील कुटुंबीयांकडे आज शौचालये नाहीत. ही माहिती सरकारच्याच जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यामुळे संपूर्ण राज्य हगणदारी मुक्त झाल्याच्या दावा कशाच्या जोरावर करण्यात आला याबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.






















































